‘फॉरेव्हर केमिकल’चा मुद्दा संसदेत
लक्ष्मी ऑर्गेनिकची निर्मिती थांबवण्याची राज्यसभेत मागणी
खेड: लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गेनिक केमिकल्स कंपनीकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या ‘पीएफएएस’ (PFAS) या अत्यंत घातक रसायनाचा मुद्दा राज्यसभेचे उपनेते आणि खासदार प्रमोद तिवारी यांनी चालू अधिवेशनात हा विषय मांडत, या ‘फॉरेव्हर केमिकल’ची निर्मिती तत्काळ थांबवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
खासदार तिवारी यांनी सभागृहात स्पष्ट केले की, अशा धोकादायक रसायनांचे उत्पादन करणे नियमबाह्य आहे. हे रसायन मानवी आरोग्यासाठी अत्यंत गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्याचे उत्पादन कोणाच्याही अधिकारात येत नाही, असे सांगत त्यांनी तातडीने बंदी घालण्याची मागणी केली. हे रसायन पर्यावरणात कधीही नष्ट न होता दीर्घकाळ टिकून राहत असल्याने याला ‘फॉरेव्हर केमिकल’ म्हटले जाते. या रसायनामुळे कर्करोग, हार्मोनल बिघाड, प्रतिकारशक्ती कमी होणे यांसारखे आजार बळावतात, तसेच पाणी आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञ आणि आरोग्य अभ्यासकांनी आधीच दिला आहे.
गेल्या काही काळापासून स्थानिक पातळीवर या उत्पादनाला कडाडून विरोध होत आहे. पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गावभेटी, जनजागृती दौरे आणि आंदोलनांच्या माध्यमातून जनरेटा निर्माण केला होता.














