आपल्या सर्वांगीण विकासासाठी युतीच्या उमेदवारांना निवडून द्या

आमदार किरण सामंत यांचे शिरवली येथील सभेत आवाहन

लांजा (प्रतिनिधी) आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार शैलेश खामकर आणि विनया गांगण यांना बहुमताने निवडून आणा, असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी शिरवली येथे पार पडलेल्या प्रचार सभेत केले.
आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार सध्या तालुक्यात जोरदारपणे सुरू आहे. भांबेड जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या विनया गांगण आणि भांबेड पंचायत समिती गणातून भाजपाचे तालुकाध्यक्ष शैलेश खामकर हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. शैलेश खामकर यांच्या रूपाने युतीच्या माध्यमातून तरुण नेतृत्व, हुशार आणि सुशिक्षित उमेदवार देण्यात आला आहे.‌ शैलेश खामकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला असून त्यांचा देखील दांडगा जनसंपर्क आहे. तर विनया गांगण यांनी यापूर्वी भांबेड ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून काम सांभाळले आहे.‌
या दोन्ही युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभा शिरवली येथे नुकतीच पार पडली. यावेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता मतदारांनी शैलेश खामकर आणि विनया गांगण या तरुण उमेदवारांना बहुमताने निवडून आणावे आणि आपल्या गावचा विकास साधावा.‌ केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपा युतीची सत्ता आहे.‌ त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना बहुमताने निवडून आल्यानंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच हातभार लागणार आहे.‌ याशिवाय आगामी काळात विविध शासकीय योजना देखील गावकऱ्यांना पुरवल्या जातील. त्यामुळे मतदारांनी शिवसेना भाजपा युतीच्या या दोन्ही उमेदवारांना निवडून आणा, असं आवाहन त्यांनी केले.
या सभेला आमदार किरण सामंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी जगदीश राजापकर, राजन देसाई, उमेदवार शैलेश खामकर, विनया गांगण यांच्यासह अन्य शिवसेना, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.