भटवाडी येथील श्री दत्त भवानी मंदिरात १७ फेब्रुवारी होणार स्वामी समर्थ पादुकांचे (पालखी) आगमन

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

लांजा (प्रतिनिधी) लांजा भटवाडी येथील श्री दत्त भवानी मंदिर येथे मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.०० वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पालखीचे आगमन होणार आहे.‌ या पंचविसाव्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका( पालखी) ही गेल्या २४ वर्षांपासून लांजा भटवाडी येथील श्री दत्त भवानी मंदिरात येत असते. यावर्षीचे २५ वे वर्ष असल्याने
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त रात्री ओम चैतन्य वारकरी सांप्रदायिक मंडळ, आगरवाडी (बुवा दर्शन आग्रे आणि मंडळी) यांच्या हरीपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे नारदीय कीर्तनकार ह. भ. प.मोहक बुवा प्रदीप रायकर यांच्या नारदीय किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री आठ ते दहा वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल.
मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन होणार आहे. आगमन झाल्यानंतर लांजा तहसील कार्यालयापासून ढोल ताशांच्या गजरात श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत करून मिरवणुकीला सुरुवात होईल.‌ सायंकाळी पाच वाजता लांजा भटवाडी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मठ श्री दत्त मंदिर या ठिकाणी वाजत गाजत पालखीचे आगमन होईल. त्यानंतर सहा ते सात या वेळेत वारकरी मंडळी यांचे भजन होईल. सात ते आठ पूजा व आरती आणि त्यानंतर रात्री आठ ते दहा या वेळेत हनुमान प्रासादिक भजन मंडळ बाजारपेठ लांजा यांचे भजन ,त्यानंतर रात्री दहा वाजता महाप्रसाद. दिनांक १८ फेब्रुवारी पहाटे ५.३० ते ६.३० वेळेत श्री स्वामींच्या पादुकांवर अभिषेक होणार असून आरती नंतर प्रसाद होईल आणि आठ वाजता पालखीचे पुढील ठिकाणी प्रस्थान होईल.
या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजय शिंदे यांनी केले आहे.