जिल्हा परिषद उमेदवारांसह दोडामार्ग पं स. वर महायुतीचा झेंडा फडकवा : ना. नितेश राणे यांचे आवाहन

दोडामार्गात महायुती उमेदवार प्रचारार्थ सभा संपन्न

दोडामार्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे नेतृत्व खासदार नारायण राणे साहेब करीत आहेत. महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. काही जणांची मस्ती उतरविण्यासाठी निवडणुका महत्वाच्या आहेत. कार्यकर्त्यांनी सुचविलेले उमेदवार दिले आहेत. तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद उमेदवार महायुतीचेच निवडून आले पाहिजेत. दोडामार्ग पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. प्रलंबित विकासकामांना निधी देण्याची जबाबदारी माझी आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी माटणे येथे प्रचार सभेत केले.

पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांची संयुक्त प्रचार सभा माटणे जि. प. मतदार संघात बुधवारी पार पडली. माटणे जिल्हा परिषद साठी महायुतीचे उमेदवार दिपक गवस, झरेबांबर पंचायत समितीसाठी नेहा गवस, माटणे पंचायत समितीच्या उमेदवार पार्वती गवस यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा झाली.

यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उमेदवार दिपक गवस पंचायत समिती कोलझर बिनविरोध उमेदवार तथा शिवसेना दोडामार्ग प्रमुख गणेशप्रसाद गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजेंद्र निंबाळकर, संतोष नानचे, अनिल शेटकर, प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या तीनही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. शासनाच्या विविध योजना सक्षमपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता असणे आवश्यक आहे. या भागाच्या विकासासाठी १ कोटी रुपये निधी देणार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी निवडणूक आपल्या हातात घ्यावी. भविष्यात विकास निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिला.

आ. दीपक केसरकर म्हणाले, केंद्रासह राज्यात भाजप – शिवसेना महायुती सरकार आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुती सत्ता येणे आवश्यक आहे. महायुती कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी मनीष दळवी, राजेंद्र निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील सरपंच, भाजपा व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.