कात्रज-देहू रोड बायपासवर भीषण अपघात; मिनीट्रकच्या हेल्परचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

डंपरच्या धडकेत पहाटेचा अपघात, हिंजवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल
पाण्याच्या बाटल्यांची डिलिव्हरी करताना काळाने घातला घाला

कात्रज-देहू रोड बायपासवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मिनीट्रकवरील एका तरुण हेल्परचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. मागून आलेल्या डंपरने मिनीट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातावेळी हेल्पर वाहन चालवत होता, तर चालक सहचालकाच्या सीटवर बसला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी डंपरचालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.


पुणे : कात्रज-देहू रोड बायपास मार्गावर रविवारी पहाटे २.४० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मिनीट्रकवरील हेल्परचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. मागून आलेल्या डंपरने मिनीट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातात मयूर घोरपडे (वय २८, रा. वडगाव धायरी) यांचा मृत्यू झाला आहे. तर सोमनाथ ढाके (वय ३५, रा. वडगाव धायरी) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंजवडी पोलिसांच्या माहितीनुसार, ढाके हे मिनीट्रकचे चालक असून घोरपडे हे मदतनीस होते. शनिवारी रात्री उशिरा कामशेत येथून पिण्याच्या पाण्याच्या १०० बॉक्सची डिलिव्हरी घेऊन ते कात्रजच्या दिशेने निघाले होते. अपघाताच्या वेळी घोरपडे वाहन चालवत होते, तर ढाके शेजारी बसले होते.

ते ताथवडे परिसरात पोहोचले असताना मागून आलेल्या डंपरने त्यांच्या मिनीट्रकला धडक दिली. धडकेनंतर वाहनावरील ताबा सुटल्याने मिनीट्रक बाजूला घसरला. या अपघातात घोरपडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर ढाके यांच्या डोक्याला आणि पायाला इजा झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

परिसरातील नागरिकांनी तातडीने दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी मयूर घोरपडे यांना मृत घोषित केले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी डंपरचालकाविरोधात निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातून आरोपी चालकाला अटक केली असल्याची माहिती दिली.