अपंगत्वाला कंटाळून ५० वर्षीय प्रौढाचा अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

लांजा (प्रतिनिधी) अपंगत्वाला कंटाळून एका ५० वर्षीय प्रौढाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी २३ ऑक्टोबर सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील गवाणे येथील रेवाळेवाडी येथे घडली. प्रभाकर सखाराम रेवाळे असे त्यांचे नाव असून ते ७५ ते ८० टक्के भाजल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. प्रभाकर रेवाळे हे दोन्ही पायांनी अपंग आहेत. घरात ते, त्यांचा भाऊ आणि भावजय असे राहतात. प्रभाकर रेवाळे यांचे संगोपन त्यांची भावजय करत होती. शुक्रवारी सकाळी भावजय पाहुणी गेली होती. तर भाऊ कामासाठी बाहेर गेला होता. त्यामुळे घरात कोणीच नव्हते. त्याचवेळी प्रभाकर रेवाळे यांनी घरातील रॉकेल घेतले आणि ते घराच्या मागे असणाऱ्या परसबागेतील केळीच्या झाडाजवळ गेले. त्याठिकाणी त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

हा प्रकार त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी पाहिला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळविले पण ते जवळपास ७५ ते ८० टक्के भाजल्याने ग्रामस्थांनी त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे दाखल केले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल जान्हवी मांजरे करत आहेत.