काही लोकांनी स्थापन केलेल्या समन्वय समितीची गरज नाही : उपनगराध्यक्ष मिताली सावंत
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रभाग १० मध्ये तीन ते चार कोटींची विकासकामे
सोशल मीडियावरील अपप्रचारामुळे बदनामी होत असल्याचा आरोप; तीन वर्षांतील विकासकामांची यादी प्रसिद्ध केली
देवगड : प्रतिनिधी
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये विकासकामांवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा मिताली राजेश सावंत यांनी काही लोकांकडून स्थापन करण्यात आलेल्या ‘समन्वय समिती’च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रभागातील विकासकामे यापूर्वीच नगरपंचायतीच्या ठरावांमध्ये प्रस्तावित करण्यात आली असून, त्यासाठी अशा समितीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना नगरसेविकेने कामे केलेली नाहीत, असे सांगून आपल्याविरोधात भडकविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मिताली सावंत यांनी केला आहे. किरकोळ कामांच्या याद्या सोशल मीडिया ग्रुपवर प्रसिद्ध करणे, खोटे व खोडसाळ आरोप करणे तसेच बॅनर लावून आपली बदनामी करण्याचे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकारांमुळे आपल्याला मानसिक त्रास होत असून, आपली आणि पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समन्वय समिती प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांकडून विकासकामांची माहिती घेते आणि ती पालकमंत्र्यांकडे पाठवते. मात्र, संबंधित कामे नगरसेवकांनी यापूर्वीच प्रस्तावित केलेली असतात, असे सावंत यांनी म्हटले आहे. प्रभाग क्रमांक १० मधील आवश्यक कामे समितीने नगरपंचायतीकडे दिली असली, तरी त्यातील सर्व कामे आपण २७ सप्टेंबर २०२२ रोजी नगरपंचायतीच्या ठरावामध्ये प्रस्तावित केली होती, असा दावा त्यांनी केला आहे.
मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयातून कामांची यादी घेऊन, ती कामे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतल्याची प्रसिद्धी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कामांबाबत पालकमंत्र्यांना वस्तुस्थितीची पूर्ण कल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांनी यापूर्वी प्रस्तावित केलेल्या कामांचा गाजावाजा न करता प्रत्यक्ष विकासकामांवर भर दिला असल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे.
एप्रिल २०२३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १० मध्ये सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची विकासकामे आणल्याचे मिताली सावंत यांनी सांगितले. यातील काही कामे पूर्ण झाली असून, ती नागरिकांना प्रत्यक्ष पाहायला मिळत आहेत, तर काही कामे प्रतीक्षा यादीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक सक्षमपणे काम करीत असून, नागरिकांचे सहकार्य आपल्याला मिळत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रभागातील विकासकामांबाबत वस्तुस्थिती नागरिकांसमोर यावी, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामांची यादी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांसमोर ठेवत असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
‘काही लोकांनी स्थापन केलेल्या समन्वय समितीची आम्हाला आवश्यकता नाही. प्रभागातील विकासकामे यापूर्वीच प्रस्तावित केलेली असून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे,’ अशी भूमिका नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांनी मांडली आहे.















