संगमेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची जोरदार हजेरी

भातपिकाचे नुकसान; हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला; बळीराजा चिंतेत
देवरूख-साखरपा मार्गावर झाड पडल्याने वाहतूकीवर परिणाम
निलेश जाधव / देवरूख

संगमेश्वर तालुक्यात वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह आज शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरशः दाणादाण उडवली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, भातपिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. वर्षभर कष्ट करून भातपीक जगविणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाला पावसाचा फटका बसला आहे. तर देवरूख- साखरपा मार्गावर झाड पडल्याने वाहतूक काहीवेळ‌ ठप्प झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात भातशेती हा अनेक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याचे चित्र समोर येत आहे.