खेड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे फायर ब्रँड नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी कोकणाच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत ठाम भूमिका मांडली. सुकवली जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उमेदवार सचिन धाडवे यांच्या प्रचारासाठी खेड तालुक्यातील तळे येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

रामदास कदम म्हणाले की, कोकणातील तरुणांना रोजगारासाठी मुंबईकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवर उद्योग, प्रक्रिया केंद्रे आणि कौशल्याधारित रोजगारनिर्मिती आवश्यक आहे. कोकणाची निसर्ग संपन्नता आणि भौगोलिक वैशिष्ट्यांचा योग्य वापर करून येथेच रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली, पर्यावरण संरक्षणासाठी कडक पावले उचलली आणि विकासाभिमुख धोरणांची अंमलबजावणी केली. “आता पुन्हा एकदा कोकणासाठी झोकून देऊन काम करण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, बचत गट, गृहउद्योग आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. महिलांना रोजगाराच्या संधी मिळाल्यास कुटुंब आणि समाजाचा पाया मजबूत होतो, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना, विशेषतः सुकवली जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सचिन धाडवे व पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय मिळवून संपूर्ण कोकणात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त केला. शिवसेनेच्या माध्यमातून खेड तालुक्यासह संपूर्ण कोकणात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले जाईल, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.













