केवळ राजकीय स्वार्थासाठी अपुरी माहिती घेऊन विरोधकांचे कटकारस्थान

कारुळ ग्रामपंचायत इमारत बांधकामाचा प्रस्ताव केंव्हाच शासनदरबारी : मंगेश जोशी

गुहागर | प्रतिनिधी
तालुक्यातील कारुळ ग्रामपंचायत इमारतीचा प्रस्ताव शासनदरबारी वेळोवेळी देण्यात आला असून विविध योजनांच्या माध्यमातून ही इमारत लवकरात लवकर बांधून मिळावी यासाठी तत्कालीन सरपंच मीनल जोशी यांनी विविध स्तरावर मागणी केली असताना देखील केवळ राजकीय स्वार्थासाठी काहीजण चुकीची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून पसरवली जात असल्याचे स्पष्टिकरण तळवली पंचायत समिती गणाचे भाजपचे उमेदवार मंगेश जोशी व कारूळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच एकनाथ मोहित यांनी दैनिक प्रहारशी बोलताना केले.
गुहागर तालुक्यातील कारुळ ग्रामपंचायतची इमारत मागील काही वर्षे जीर्ण अवस्थेत आहे. मुख्य म्हणजे याठिकाणी सदर ईमारतीचे निर्लेखन करण्यासाठी तसेच विविध योजनेतून इमारत बांधकामासाठी देखील तत्कालीन माजी सरपंच मीनल जोशी यांनी सन 2022 पासून प्रस्ताव सादर केला आहे.तर ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर ईमारतीची जागा उंच भागात असल्याने वृद्ध नागरिकांना ये – जा करण्यासाठी त्याचा त्रास होऊ नये यासाठी सदर इमारत बांधकाम अन्यत्र व्हावे यासाठी ग्रामपंचायतमध्ये तसा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.सध्य स्थितीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी अतिशय चांगली सुविधा देण्यात आली आहे.तसेच मीनल जोशी या 15 वर्षे सरपंच असल्याचा चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.मात्र प्रत्यक्षात 10 वर्षेच मीनल जोशी या सरपंचपदी कार्यरत होत्या.मागील दोन वर्षे
येथील ग्रामपंचायतीवर प्रशासक आहेत. त्यामुळे केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कोणतीही संपूर्ण माहिती नसताना चुकीचा संदेश देऊ पाहणाऱ्यांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतमध्ये येऊन कागदपत्रांची पाहणी करावी असे आव्हान देखील तत्कालीन उपसरपंच एकनाथ मोहित यांनी केले आहे.