महायुतीच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री नितेश राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. पालकमंत्री यांच्या
माध्यमातून शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. या विकासकामांच्या जोरावर शिरगाव जि. प. मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी व्यक्त केला.
शिरगाव आठवडा बाजाराच्या दिवशी शिरगाव बाजारपेठेत महायुतीच्या वतीने भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘महायुतीचा विजय असो’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच विविध सामाजिक व मूलभूत सुविधा विकासकामे मार्गी लागली आहेत. या विकासकामांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळाल्यामुळे मतदारांमध्ये महायुतीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे संदीप साटम यांनी सांगितले.
सध्या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार गावोगावी सुरू असून त्याला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक एकजुटीने उमेदवारांच्या विजयासाठी जोमाने मेहनत घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.











