
रत्नागिरी | प्रतिनिधी : Ajax स्पोर्ट्स क्लब व मराठा योद्धा फुटबॉल क्लब आयोजित कै. ओंकार बाने स्मृती चषक 2023 भव्य राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक 20 जुलै ते 23 जुलै या कालावधीत पोलिस ग्राउंड रत्नागिरी येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी झाले होते सदर स्पर्धा लीग पद्धतीने खेळली गेली. स्पर्धेचा अंतिम सामना सुयोग मँगो फुटबॉल क्लब विरुद्ध मराठा योद्धा फुटबॉल क्लब या दोन तुल्यबल संघामध्ये झाला. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात सुयोग मँगो फुटबॉल क्लब संघाने मराठा योद्धा फुटबॉल क्लब संघावर 3-0 असा विजय प्राप्त करून विजेता चषक व 55000/- रोख पारितोषिक आपले नावे केले तर मराठा योद्धा फुटबॉल क्लब संघाला उपविजेता चषक रोख पारितोषिक 33000/- प्रदान करण्यात आला.
स्पर्धेमध्ये महापुरुष पोलिस संघाला शिस्तबध्द संघ म्हणून चषक देवून गौरवण्यात आले. या स्पर्धेमध्ये बेस्ट स्ट्रायकर म्हणून मराठा योद्धा फुटबॉल क्लब संघाच्या सिद्धेश निखार्गे याला आकर्षक चषक व noise कंपनी चे स्मार्टवॉच देवून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुयोग मँगो फुटबॉल क्लब संघाच्या सुशील याला आकर्षक चषक व noise कंपनी चे स्मार्ट वॉच देवून गौरविण्यात आले. सदर स्पर्धेचे पहिले पारितोषिक रोख रक्कम 55000/- हे माननीय माजी आमदार बाळासाहेब माने यांनी पुरस्कृत केले होते. तसेच द्वितीय पारितोषिक मराठा योद्धा फुटबॉल क्लब व अजॅक्स स्पोर्ट्स क्लब यानी पुरस्कृत केले होते. स्पर्धा दरम्यान वितरित करण्यात आलेले आकर्षक चषक गजानन पाथरे यांनी पुरस्कृत केले होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ करीता माजी आमदार बाळासाहेब माने, पोलिस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक श्री निकम, उद्योजक गजानन पाथरे, गोगटे जोगळेकरचे माजी क्रीडाप्रशिक्षक चंद्रकांत घवाळी, प्रसिद्ध आंबा व्यापारी भाई पेडणेकर व राजु पेडणेकर व्यासपीठावर उपस्थित होते.












