पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे गुरुवारी वितरण

शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे : सुनंदा कुऱ्हाडे

रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदाव्या हप्त्याचा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांना सीकर, राजस्थान येथून गुरुवार २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी दिली.
या समारंभास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे जिल्ह्यातील सर्व कृषी सहाय्यक सजामध्ये, ग्रामपंचायत स्तरावर प्रक्षेपण करण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र, प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन कंपन्या, शेतकरी गट, फळपिकनिहाय शेतकऱ्यांचे गट, आत्मा अंतर्गत स्थापन करण्यात आलेले गट, कृषी प्रात्याक्षिक व प्रशिक्षण यामध्ये समाविष्ट होणारे गट अशा विविध संस्थांमार्फत कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईलवरुन https://pmindiawebcast.nic.in या लिंकचा वापर करून अर्धा तास अगोदर सहभागी व्हावे आणि या सोहळयाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहनही केले आहे.