पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा राजापूरात पुरस्थिती

पुराची जवाहर चौकाच्या दिशेने आगेकूच

राजापूर | प्रतिनिधी  : मंगळवारी दुपारपासून पुन्हा मुसळधारपणे बरसणार्या पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे पुराचे पाणी शहरात येण्याची शक्यता आहे . बुधवारी सकाळी पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने वाढू लागले असुन प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत .
गत आठवड्यात पावसाने जोर घेतला होता त्यामुळे पुराच्या पाण्याचा वेढा राजापूर शहरातील जवाहर चौकाला बसला होता . मात्र सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पुराचे पाणी ओसरले होते व जनजीवन पुन्हा पुर्वपदावर आले होते . मात्र एक दिवस काहीशी उसंत घेतल्यानंतर पुन्हा मंगळवारी दुपारपासून पावसाने बरसायला सुरुवात केल्याने अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे . अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असुन शहराला पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे .दरम्यान जिल्हा प्रशासनाने सर्व शाळाना आज अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर केली आहे . आज सकाळी जिल्हाधिकार्यानी शाळाना सुट्टी जाहीर केल्यामुळे सकाळी शाळेसाठी आलेल्या अनेक मुलाना परतीचा प्रवास करावा लागला आहे .