Update: खेड तालुक्यातील आदर्श मतदान केंद्रावरील बिघाड अखेर दूर

एक तासानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत

खेड (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान खेड तालुक्यातील निगडे बोरज येथील आदर्श मतदान केंद्रावर आज सकाळपासून मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. गेल्या एक तासापासून बंद पडलेली ईव्हीएम मशीन अखेर प्रशासनाकडून बदलण्यात आली असून त्यानंतर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर मशीन अचानक बंद पडल्याने मतदारांना मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा करावी लागली. सकाळच्या वेळेत मतदानासाठी आलेले मतदार रांगेत उभे राहिले होते, मात्र मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान करता न आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत नवीन मतदान यंत्र उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया हाती घेतली.
दरम्यान, खेड तालुक्यात एकूण सहा ते सात मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या सर्व ठिकाणी तात्काळ पर्यायी मतदान यंत्र उपलब्ध करून देण्यात आली असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी दिली आहे. प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अडथळा टळला असला तरी सुरुवातीच्या वेळेत झालेल्या खोळंब्यामुळे मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.