चिपळुणात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५०.४७ टक्के मतदान

आंबडस गणातील साखर येथील 115 व 100 वर्षाच्या आजींना मतदानांला नेतांना खेडचे माजी सभापती संतोष उतेकर
ईव्हीएमची बोंबाबोंब; मतदारांचा संताप
तोंडली येथे भरारी पथकाकडून ६८ हजार रुपयांची रोकड जप्त

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणांसाठी शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले. मात्र सकाळपासूनच ईव्हीएम मशीन बिघडण्याचे प्रकार समोर आले. यामुळे मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. या प्रकाराबाबत आमदार शेखर निकम यांच्यासह भाजप नेते प्रशांत यादव यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५०.४७ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू राहिल्याने अधिकृत आकडा समजू शकला नाही. दरम्यान, तोंडली येथे भरारी पथकाने ६८ हजार रुपयांची रक्कम पकडल्याने खळबळ उडाली आहे.

चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना- भाजप युती तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्ष शिवसेना उबाठा पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले आहेत. दिनांक ५ रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या तर शनिवार दिनांक ७ रोजी सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू झाले. मात्र, सकाळपासूनच ईव्हीएम मशीन बिघडण्याचे प्रकार समोर आले. यामध्ये खेर्डी जिल्हा परिषद गटामध्ये तब्बल चार ते पाच मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने मतदारांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागली. संतप्त मतदारांनी नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील विविध भागांत ईव्हीएम बिघाडाच्या घटना समोर आल्या. शिरगाव, सावर्डे, पिंपळ मोहल्ला, कुडप, गुढेकरवाडी, मांडकी, खरवते, कोंढरताम्हाणे, कापरे, कापसाळ, कळंबस्ते आदी ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. तरीही सकाळच्या टप्प्यात काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत होती, मात्र मशीन बंद पडल्याने ही गर्दी संतापात बदलत गेली. तर दुसरीकडे कुंभार्लीमध्ये वसंत ताम्हणकर यांच्या उजव्या बोटाला शाही लावण्यात आली. डाव्या बोटाला शाही लावली जाते. पण या निवडणुकीत एका नवा प्रकार पाह्यला मिळाला.

दरम्यान, या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. त्या सर्व ठिकाणी तत्काळ जादा ईव्हीएम मशीन पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जवळपास ५० अतिरिक्त ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून, भविष्यातील बिघाड टाळण्यासाठी पूर्वतयारी म्हणून प्रत्येक ठिकाणी जादा मशीन सज्ज ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावर हजर राहणाऱ्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदानाची वेळ वाढविण्यात येईल, असेही लिगाडे यांनी सांगितले.