कसबा–भवानी पेठेत ‘शून्य कचरा’ उपक्रमाची सुरुवात; घरोघरी 100 टक्के कचरा संकलनाचा संकल्प

पीएमसी आणि स्वच्छ सहकारी संस्थेचा संयुक्त पायलट प्रकल्प
कचरा वेचक व नागरिकांच्या सोयीला प्राधान्य, सातही दिवस सेवा

पुणे महापालिकेने कसबा आणि भवानी पेठ भागात घरोघरी शंभर टक्के कचरा संकलनासाठी ‘स्वच्छता पेठ – शून्य कचरा कसबा भवानी’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. हा प्रकल्प स्वच्छ सहकारी संस्थेच्या सहकार्याने राबवला जात असून नागरिक आणि कचरा वेचक दोघांच्याही सोयी लक्षात घेण्यात आल्या आहेत. रात्रीचा कचरा संकलन, बदली व्यवस्था आणि पर्यायी कर्मचाऱ्यांमुळे सेवा अखंडित राहणार आहे. आठवड्यातील सातही दिवस कचरा संकलन सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. कमी उत्पन्न गटांवर आर्थिक भार पडू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


पुणे : कसबा आणि भवानी पेठ परिसरात घरोघरी 100 टक्के कचरा संकलन सुनिश्चित करण्यासाठी पुणे महानगरपालिका (PMC) आणि स्वच्छ सहकारी संस्था (SWaCH) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ‘स्वच्छता पेठ – शून्य कचरा कसबा भवानी’ या पायलट प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमाबाबत माहिती देताना कचरा वेचक आणि SWaCH च्या बोर्ड सदस्य विद्या नाईकनवरे म्हणाल्या की, हा प्रकल्प तयार करताना कचरा वेचक आणि नागरिक या दोघांच्याही गरजांना प्राधान्य देण्यात आले आहे. रात्रीचा कचरा संकलन, बदली यंत्रणा आणि पर्यायी कर्मचारी उपलब्ध असल्याने सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील.

या पथदर्शी प्रकल्पात नागरिकांना प्रत्येक सात दिवसांनी अतिरिक्त कचरा संकलन सेवा दिली जाणार असून, सातव्या दिवशी कचरा वेचकांच्या मानधनाला PMC कडून पाठबळ दिले जाणार आहे. त्यामुळे सेवा सातत्याने सुरू राहण्यास मदत होणार आहे.

PMC आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रहार डिजिटल शी बोलताना सांगितले की, SWaCH ची घरोघरी कचरा संकलन सेवा आठवड्यातील सातही दिवस सर्व भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी झोपडपट्टी अनुदान आणि बदली प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे.

SWaCH चे आउटरीच आणि कम्युनिकेशन प्रमुख अमोघ भोंगले म्हणाले की, कमी उत्पन्न असलेल्या रहिवाशांवर सेवा शुल्काचा बोजा पडू नये यासाठी कचरा वेचकांना 50 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला आहे. तसेच लक्ष्मी रोडवरील दुकाने आणि रस्त्यावरील विक्रेते यांच्यासाठी संध्याकाळच्या वेळेत स्वतंत्र सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे शून्य कचरा संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास मदत होणार असून, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या दिशेने शहराचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.