भाजपच्या रितू तावडेंचे तळ कोकणाशी घट्ट नाते
राजापूर तालुक्यातील वाल्ये गावच्या सूनबाईंना मिळाला मोठा मान
राजापूर : प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाकडून रितू तावडे यांची निवड जाहीर झाल्याने राजापूर तालुक्यासह संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या ११ फेब्रुवारी रोजी त्या महापौरपदी विराजमान होणार आहेत. रितू तावडे यांचे सासर राजापूर तालुक्यातील वाल्ये हे गाव असून त्यांचे माहेर कोकणातील मालवण तालुक्यात आहे. त्यामुळे त्यांचे कोकणशी असलेले नाते विशेष जिव्हाळ्याचे मानले जात आहे.
वाल्ये गावाशी रितू तावडे यांचा घनिष्ठ संबंध असून त्या दरवर्षी आपल्या कुटुंबीयांसमवेत वाल्ये येथील निनादेवी मंदिराच्या वार्षिक उत्सवासाठी तसेच विविध सामाजिक, धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी उपस्थित राहत असतात. त्यांच्या या नियमित उपस्थितीमुळे गावकरी व परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी आहे.
मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत महानगरपालिकेच्या महापौरपदासारख्या मानाच्या पदासाठी कोकणच्या कन्येची निवड झाली असल्याने ही वाल्ये गावासह राजापूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी ही प्रेरणादायी गोष्ट असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महापौरपदी त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने वाल्ये ग्रामस्थ, राजापूर तालुक्यातील नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकाळात मुंबई महानगरपालिकेमार्फत लोकहिताचे, विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईला ७८ वा महापौर मिळणार आहे. या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, ११ फेब्रुवारीलाच दुपारी १२ वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात नवीन महापौरांची अिधकृत घोषण होणार आहे.













