सिद्धी शेट्ये यांची रत्नागिरी युवासेना उपतालुकाप्रमुख पदी निवड

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

​रत्नागिरी:
शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक वाढीत आणि सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असणारे शिरगावचे सुपुत्र सिद्धी शेट्ये यांची रत्नागिरी युवासेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

​सिद्धी शेट्ये यांनी यापूर्वी जिल्हा परिषद गट विभागप्रमुख म्हणून काम पाहताना शिरगाव गटात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, युवकांचे संघटन करणे आणि सामाजिक उपक्रमांत हिरीरिने भाग घेणे यामुळे वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची दखल घेत ही नवीन जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

​शिरगाव आणि परिसरातील सामाजिक क्षेत्रात सिद्धी शेट्ये यांचा मोठा वावर आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या आणि युवकांच्या अडीअडचणींना तातडीने धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव, दांडगा जनसंपर्क आणि तरुण वर्गातील पकड यामुळे त्यांना सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
​
पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये तालुकाप्रमुख बंड्या साळवी, ​बाबू म्हाप, सुदेश मयेकर, ​राजेंद्र महाडिक, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, तालुकाप्रमुख ​हर्षराज पाटील ​यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी सिद्धी शेट्ये यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.