रुपेश वाईकर (दापोली प्रतिनिधी) : दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज अत्यंत उत्साहात आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यात 53.87 मतदानाची नोंद झाली आहे. सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या असून, उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.
सकाळपासूनच मतदारांचा उत्साह सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. तरुण मतदारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक नवमतदारांनी आयुष्यातील पहिले मतदान केल्याचा आनंद व्यक्त केला, तर वयोवृद्ध नागरिकांनीही प्रकृतीची पर्वा न करता लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
*तांत्रिक बिघाड; प्रशासनाची तत्परता*
मतदान प्रक्रियेदरम्यान दापोली तालुक्यातील दोन मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे आढळून आले. मात्र प्रशासनाने कोणताही विलंब न करता तातडीने सदर यंत्रे बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू केली. कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून तब्बल ६६ राखीव ईव्हीएम यंत्रे सज्ज ठेवण्यात आली होती.
*कडक पोलीस बंदोबस्त आणि नियोजन*
तालुक्यातील २१३ मतदान केंद्रांवर शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक प्रक्रियेसाठी ९३६ अधिकारी व कर्मचारी, २१३ शिपाई, तर पोलीस यंत्रणेतून २७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी ३४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
*उमेदवारांची धाकधूक वाढली*
दापोली तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये सायंकाळी ५.३० वाजता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. या निवडणुकीत रिंगणात असलेल्या विविध पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांचे भवितव्य आता सीलबंद झाले आहे. दापोली तालुक्याची लढत ही शिवसेना विरूध्द भाजप, राष्ट्रवादी व उबाठा अशी होती. दोन्ही बाजूंकडून साम-दाम-दंड-भेद या नितीचा वापर करून एकमेकांना जेरीस आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला. तालुक्यामध्ये दाभोळ जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाच्या स्मिता जावकर विरूध्द शिवसेनेच्या साधना महाजन, जालगांव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे अक्षय फाटक विरूध्द शिवसेनेचे किशोर देसाई, केळशी गटामध्ये शिवसेनेचे नितीन दुर्गवले विरूध्द उबाठाचे गुणाजी गावणूक या तर वाकवली गणामध्ये शिवसेनेचे निलेश शेठ विरूध्द उबाठाचे रविंद्र घडवले, जालगांव मध्ये भाजपाचे श्रीराम इदाते विरूध्द शिवसेनेचे मंगेश पवार, जुईकर मोहल्ला गणामध्ये शिवसेनेचे उन्मेष राजे विरूध्द उबाठाचे रविंद्र धाडवे या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दापोली तालुक्यात एकूण १,४०,५५८मतदार असुन ३५,६४५ पुरुष तर ४०,०७२ स्त्रिया अशा एकुण ७५,७१७ मतदारांनी आपला हक्क बजावला असल्याचा म्हणजेच ५३.८६% इतके मतदान
असून मतदार राजाने नेमका कोणाला कौल दिला आहे हे दि. 9 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे.











