आंबा पिकाचे प्रश्न हाताळण्यासाठी देवगडमध्ये आंबा बागायतदार व व्यापारी देवगड’ या संघटनेची स्थापना

देवगड : प्रतिनिधी

नैसर्गिक आपत्तीमुळे फळांचा राजा असलेला हापूस आंबा संकटात सापडला आहे. यामुळे आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले असतानाही शासन व प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही, न्याय मिळवण्यासाठी नवीन संघटनेची निर्मिती करण्यात आली.यावेळी ‘आंबा बागायतदार व व्यापारी देवगड’ ही नवीन संघटना स्थापन करण्यात आली.

जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते.

बागायतदारांना नुकसानभरपाई, आंब्याला हमीभाव, संशोधन केंद्र, विमा, कर्जमाफी आदी मागण्यांबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय चर्चासत्रात घेण्यात आला. यावेळी ‘आंबा बागायतदार व व्यापारी देवगड’ ही नवीन संघटना स्थापन करण्यात आली.

जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार व व्यापाऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. आंबा बागायतदार नरेश डामरी यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र पार पडले. यावेळी आंबा बागायतदार प्रशांत शिंदे, काका ढोके, विनायक जोईल, किरण टेंबुलकर, विनय पाडावे, तुषार पाळेकर, गणेश वाळके, चंदन घाडी, निरज घाडी, अजय नाणेरकर, सागर जोईल, शंकर नाणेरकर, निलेश पेडणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी सागर जोईल यांनी उपस्थित बागायतदारांनी आपल्या समस्या, व्यथा आणि मागण्या मांडाव्यात, त्या मागण्या शासनस्तरापर्यंत पोहोचवायच्या आहेत, असे सांगितले. नरेश डामरी यांनी बागायतदारांनी सुचविलेल्या मागण्या पुढे नेण्याची गरज असून उपस्थित बागायतदारांनी आपल्या मागण्या मांडाव्यात, अशी सूचना केली.

आंबा बागायतदार अरविंद पेडणेकर यांनी बागायतदारांच्या प्रश्नांसाठी व मागण्यांसाठी आंदोलन उभे करावे लागेल, यासाठी बागायतदारांची एकजूट आवश्यक असल्याचे मत मांडले. नाजूक पिकांवर परिणामकारक असलेली कीटकनाशके हापूस आंब्यासाठी वापरली जात असल्याने त्यातील घटक तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या आंब्याला योग्य किंमत मिळत नसल्याने शेवटपर्यंत डझनप्रमाणे व ग्रेडिंगप्रमाणे सरासरी एकच भाव मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समीर चव्हाण यांनी आंबा बागायतदारांप्रमाणेच बागा करारावर घेणाऱ्या व्यापाऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळावी, असे मत व्यक्त केले. किरण टेंबुलकर यांनी आंबा व्यवसाय आता सोपा राहिलेला नसून यावर्षी आंब्यावर आलेले संकट अतिशय भयावह असल्याचे सांगितले. ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात याहूनही मोठे संकट उद्भवू शकते. या संकटाला तोंड देण्यासाठी बागायतदारांनी एकत्र येऊन मागण्या शासनापर्यंत मांडणे गरजेचे असून यामध्ये राजकारण येता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

दलाल किंवा त्यांच्या प्रतिनिधींना बोलावून वस्तुस्थिती पाहण्यास भाग पाडणे गरजेचे असून विमा रकमेतील वाढही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बागायतदारांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. निलेश पेडणेकर यांनी सरसकट नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्याची गरज असल्याचे सांगितले. दयानंद पटवर्धन यांनी कर्जमाफीची मागणी करावी, असे मत मांडले. दिनेश धुवाळी यांनी माती परीक्षण केंद्र आणि संशोधन केंद्र असणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी अमर तोडणकर, मुकुंद बापट, प्रशांत शिंदे, काका ढोके, के. एस. कदम, निलेश पेडणेकर, चंद्रकांत साईल, गणेश वाळके, महेंद्र मांजरेकर, कृष्णा आमलोसकर, विनायक जोईल, विनय पाडावे आदी बागायतदारांनी आपल्या समस्या व मागण्या मांडल्या.

आंबा बागायतदारांच्या प्रश्नांबाबत व न्याय मागण्यासाठी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. १० फेब्रुवारी रोजी कृषी कार्यालयात व ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवेदन देऊनही शासनाकडून दखल घेतली गेली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या बैठकीत ‘आंबा बागायतदार व व्यापारी देवगड’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी काका ढोके, उपाध्यक्षपदी अजय नाणेरकर, कृष्णा आमलोसकर, विनय पाडावे, जितेंद्र जाधव, सचिवपदी निलेश पेडणेकर, सहसचिवपदी दीपक कदम, खजिनदारपदी सुजित चौकेकर तर सदस्य म्हणून शंकर नाणेरकर, रविकांत झरकर, मुकेश गुरव, पांडुरंग घाडी, महेंद्र मांजरेकर, आनंद परब, शरद परब, सचिन नरे, चंदन दळवी, रूपेश येझरकर, श्रीकांत पाळेकर, उत्तम भडसाळे, अमरेश्वर हरम यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन सागर जोईल यांनी केले. यावेळी देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.