गंभीर डोळा दुखापतीनंतर तीन बांधकाम कामगारांची दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश

एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात जटिल शस्त्रक्रिया यशस्वी
कामाच्या ठिकाणी डोळ्यांच्या सुरक्षेचा अभाव पुन्हा अधोरेखित

पुण्यातील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने गंभीर डोळा दुखापत झालेल्या तीन बांधकाम कामगारांवर अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. लोखंडी खिळे व ग्राइंडिंग मशिनमुळे या कामगारांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली होती. वेळेत उपचार मिळाल्यामुळे दोन कामगारांची दृष्टी पूर्णपणे पूर्ववत झाली आहे. तिसऱ्या रुग्णाच्या दृष्टीसाठी पुढील टप्प्यात कॉर्नियल ट्रान्सप्लांटची आवश्यकता भासणार आहे. या प्रकरणामुळे बांधकामस्थळी डोळ्यांच्या सुरक्षेचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे.


पुणे : शहरातील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने डोळ्यांना गंभीर दुखापत झालेल्या तीन बांधकाम कामगारांवर कॉम्प्लेक्स कॉर्निओ-स्क्लेरल टीयर सि्युचरिंग ही अत्यंत नाजूक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया ऑपरेटिंग मायक्रोस्कोपखाली करण्यात आली.

रुग्णालयाच्या कॉर्निया विभागाच्या प्रमुख व नेत्रबँक संचालक डॉ. शिल्पा जोशी यांनी सांगितले की, लोखंडी खिळ्यांमुळे जखमी झालेल्या दोन कामगारांची दृष्टी उपचारानंतर पूर्णपणे सुधारली आहे. तर ग्राइंडिंग मशिनमुळे जखमी झालेल्या तिसऱ्या कामगाराला भविष्यात केराटोप्लास्टी (कॉर्नियल ट्रान्सप्लांट) केल्यानंतर दृष्टी पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

तीनही कामगार विशीच्या सुरुवातीच्या वयोगटातील असून ते उत्तर भारतातील रहिवासी आहेत. अपघातानंतर एक तासाच्या आत ते आपल्या सुपरवायझरसह रुग्णालयात दाखल झाले. धातूच्या कणांचा वेग जास्त असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.

रुग्णांवर प्रथम स्लिट-लॅम्प तपासणी करण्यात आली. त्यानंतर क्ष-किरण व सीटी स्कॅन करून डोळ्यात धातूचे तुकडे अडकले आहेत का, याची खात्री करण्यात आली. त्यानंतर तातडीने कॉर्निओ-स्क्लेरल टीयर सि्युचरिंग शस्त्रक्रियेसाठी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. ही शस्त्रक्रिया सुमारे तीन तास चालली.

कॉर्निया सल्लागार डॉ. स्नेहल घाडगे यांनी सांगितले की, कॉर्निया आणि स्क्लेरा या दोन्ही भागांवरील जखमा दुरुस्त करणे अत्यंत नाजूक प्रक्रिया असते. डोळ्याची अखंडता टिकवण्यासाठी, संसर्ग टाळण्यासाठी आणि अचूक ऊतक जुळवणीसाठी अतिशय सूक्ष्म टाके वापरावे लागतात.

कॉर्निया कन्सल्टंट डॉ. पूजा अंधारे यांनी सांगितले की, दोन रुग्णांच्या जखमा दृष्टी अक्षाच्या बाहेर असल्याने त्यांची प्रकृती जलद सुधारली आहे. मात्र, तिसऱ्या रुग्णाच्या मध्यवर्ती कॉर्नियाला इजा झाल्यामुळे भविष्यात कॉर्नियल ट्रान्सप्लांट आवश्यक ठरू शकते.

रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे यांनी सांगितले की, पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात कामाच्या ठिकाणी डोळ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. बहुतेक कामगार स्थलांतरित, गरीब पार्श्वभूमीतील असून त्यांच्याकडे विमा किंवा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांसारख्या लाभांसाठी आवश्यक कागदपत्रे नसतात.

डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले की, डोळ्यांना होणारी दुखापत ही अत्यंत आपत्कालीन स्थिती असून रुग्णांना तातडीने तृतीयक काळजी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्वोत्तम उपचार शक्य होतील.