दापोलीत शिंदे गटाचा झंझावात; योगेश कदमांचा बालेकिल्ला पुन्हा अभेद्य

रुपेश वाईकर (दापोली प्रतिनिधी)

भाजप–शिवसेना युती नसताना पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी दापोली तालुक्यातील राजकारणाला नवी दिशा दिली आहे. या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना (शिंदे गट) ने जोरदार मुसंडी मारत आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. थेट लढती, अघोषित आघाड्या आणि कडवी प्रचारयंत्रणा असतानाही शिंदे गटाने ६ पैकी ६ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे १२ पैकी १० गण जिंकत दापोलीवरील आपली पकड अधिक मजबूत केली. विशेष म्हणजे, राज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोलीतील आपला राजकीय ‘बालेकिल्ला’ पुन्हा एकदा अभेद्य असल्याचे अधोरेखित केले.
निवडणूकपूर्व काळात भाजप–शिवसेना युती नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेक मतदारसंघांत मित्रपक्ष आमनेसामने आले. त्यामुळे लढती अधिक रंगतदार ठरल्या. काही ठिकाणी विरोधकांमध्ये परस्पर समन्वय दिसून आला; मात्र तो निर्णायक ठरू शकला नाही. उलट, या थेट लढतींमधून शिंदे गटाची संघटनशक्ती, स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची बांधिलकी अधिक ठळकपणे समोर आली.
जिल्हा परिषदेच्या सर्व ६ गटांमध्ये शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवारांनी विजय मिळवला. पंचायत समितीमध्येही १२ पैकी १० गण शिंदे गटाने राखले. मात्र, हर्णे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुळसा जाधव, तर जालगाव पंचायत समिती गणातून भाजपचे श्रीराम उर्फ भाऊ ईदाते यांनी विजय मिळवत अपवाद ठरवला.

ग्रामीण भागातील विकासकामांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी, स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद आणि प्रभावी प्रचारयंत्रणा याचा शिंदे गटाला मोठा फायदा झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. विशेषतः दाभोळ, जालगाव, हर्णे आणि केळशी परिसरात शिवसेनेची पकड अधिक ठळकपणे जाणवली. प्रचारादरम्यान राज्यमंत्री योगेश कदम यांनी गावोगावी केलेला संपर्क, कार्यकर्त्यांना दिलेले बळ आणि “कामाच्या राजकारणा”वर ठेवलेला ठाम भर मतदारांच्या पसंतीस उतरल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. विरोधकांनी केलेला आक्रमक प्रचारही अखेर कदम यांच्याच पथ्यावर पडल्याची चर्चा आहे. एकूणच या निवडणुकीतून दापोली तालुक्याने स्पष्ट संकेत दिले असून शिंदे गटाची शिवसेना हीच तालुक्यातील प्रमुख राजकीय ताकद असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर या निकालांचे पडसाद उमटणे अटळ मानले जात आहे.

विजयी उमेदवार :-
जि. प. केळशी – नितीन दुर्गावळे – ६८९५ मते
पंचायत समिती गण केळशी – संदीप चिखले – ४००६ मते
पंचायत समिती गण जुईकर मोहल्ला – उन्मेष राजे – ४२२५ मते

जिल्हापरिषद गट दाभोळ – साधना महाजन – ७४५३ मते
पंचायत समिती गण बुरोंडी – अंकिता घुबडे – ४३५८ मते
पंचायत समिती गण दाभोळ – नम्रता तोडणकर – ३५४३ मते

जिल्हा परिषद गट हर्णे – ऐश्वर्या धाडवे – ६२८९ मते
पंचायत समिती गण हर्णे – तुळसा जाधव –
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट) – २८४१ मते
पंचायत समिती गण गिम्हवणे – सुवर्णा खळे – ३७९६ मते

जिल्हा परिषद गट पालगड – मीनाक्षी शेडगे – ७६९८ मते
पंचायत समिती गण खेर्डी – सुचिता महाडिक – ३९५७ मते
पंचायत समिती गण पालगड – राजेंद्र फणसे – ३५१५ मते

जिल्हापरिषद गट जालगाव – किशोर देसाई – ८६६३ मते
पंचायत समिती गण टेटवली – निलेश शेठ – ५५१८ मते
पंचायत समिती गण जालगाव – श्रीराम उर्फ भाऊ ईदाते – ३५७५ मते (भारतीय जनता पक्ष)

जिल्हा परिषद गट कोळबांद्रे – प्रभाकर गोलंबडे – ८६३२ मते
पंचायत समिती गण कोळबांद्रे – ममता शिंदे – ४१९० मते
पंचायत समिती गण पांगरी तर्फे हवेली – नरेश घरटकर – ३७९५ मते.

—————————————————————–
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीतून जनतेचा स्पष्ट कौल समोर आला असून, या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळाले आहे. हे यश कोण्या एका व्यक्तीचे नसून, शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्ते, मतदार आणि सर्वसामान्य जनतेचे आहे.
राज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी गेल्या काही वर्षांत तालुक्यात राबवलेल्या भरीव विकासकामांमुळेच आम्हा उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले. जनता नेहमीच विकासाच्या पाठीशी उभी राहते, हे या निवडणुकीने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता, आगामी काळात अधिक जोमाने, पारदर्शकपणे व प्रामाणिकपणे जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत.
— किशोर देसाई
विजयी उमेदवार, जालगाव जिल्हा परिषद गट