दापोली (विशेष प्रतिनिधी) : कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकटही निर्माण होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर दापोलीतील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी विशेष नमाज अदा करून अल्लाहकडे पर्जन्यवृष्टीची प्रार्थना केली.
दापोली येथील नॅशनल हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी सुमारे पाच वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक प्रार्थनेत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी एकत्रितपणे नमाज अदा करत दुष्काळाचे संकट दूर व्हावे, दापोलीसह संपूर्ण कोकणात तसेच देशभरात चांगला आणि समाधानकारक पाऊस पडावा, अशी मनोभावे दुआ केली.
इस्लाम धर्मात पावसासाठी अदा करण्यात येणाऱ्या विशेष नमाजला ‘नमाज-ए-इस्तिस्का’ असे म्हटले जाते. दीर्घकाळ पाऊस न पडल्यास, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा पाणीटंचाईचे संकट गडद झाल्यास मुस्लिम समाजात उघड्या मैदानावर सामूहिकरित्या एकत्र येऊन ही नमाज अदा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार दापोलीतील मुस्लिम बांधवांनीही ही धार्मिक परंपरा जपत अल्लाहकडे पावसासाठी प्रार्थना केली.
यावेळी उपस्थितांनी निसर्गाची अवकृपा दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, पिण्याच्या पाण्याची समस्या कमी व्हावी आणि सर्वत्र भरपूर पाऊस पडून जनजीवन सुरळीत व्हावे, अशी प्रार्थना केली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणातील जनतेमध्ये या सामूहिक प्रार्थनेची चर्चा होत असून, लवकरच पाऊस बरसून शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











