चल सखे नमनाला …या नमन गीताने जिंकली नमन प्रेमींची मने

गीतकार भिकाजी भुवड व गायक विष्णू मुदगल यांचे रसिकांनी केले कौतुक

चिपळूण (वार्ताहर) : आई जीवदानी कलामंचचे अध्यक्ष आणि चिपळूण तालुका नमन लोककला भारुड मंडळाचे अध्यक्ष भिकाजी भुवड यांच्या लेखणीतून साकारलेले नमनकलेवर आधारित “चल ग सखे नमनाला”.. या गाण्याने सध्या रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. नमन कलेचा हंगाम सुरू असताना हे गाणं यू ट्यूबवरती गाजत आहे. गेल्या वीस दिवसात सुमारे दोन लाख लोकांनी हे गाणं पाहिले आहे. त्यामुळे या गाण्याचे गीतकार भिकाजी भुवड आणि गायक विष्णू मुदगल यांच्यावरती नमन कला प्रेमींनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

विविध लोककलेतील गाणी आपल्याला सोशल मीडिया वरती पाहावयास मिळतात. यामध्ये कोकणात विशेषता जाखडी कलेवरची गाणी मोठ्या प्रमाणात शाहीर अपलोड करत असतात. मात्र सध्या नमन कलेचा हंगाम सुरू असून या नमन कलेवरती रसिकांना आवडेल असे सुंदर गीत सध्या सोशल मीडिया वरती धुमाकूळ घडत आहे. “या कोकणाची नमन कला.. चल ग सखे नमनाला” हे या गीताचे बोल असून हे गीत सध्या प्रत्येक रील्स मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे.

चिपळूण तालुक्यातील वीर गावचे सुपुत्र भिकाजी तानू भुवड यांनी या गीताची निर्मिती केली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक गीते लिहिली आणि गायिली सुद्धा आहेत. मात्र हे नमनगीत सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गीताला सुंदर असा आवाज संगमेश्वर तालुक्यातील नारडूवे गावचा सुपुत्र विष्णू मुदगल यांनी दिला आहे. त्याच्या मधुर आवाजामुळे आणखीनच हे गाणं रसिकांना भावले आहे.

कोकणातील नमन कला सादर करताना कलाकार काय काय करतो हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
सध्या या गीताने दोन लाख व्ह्युज पूर्ण केले असून प्रत्येक नमन प्रेमी हे गाणं गुणगुणत आहे. भिकाजी भुवड आणि विष्णू मुदगल यांच्या कलेचा सुद्धा नमन प्रेमींनी मनापासून कौतुक केले आहे.