११ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनवेळा सीईटीची संधी
मॅनेजमेंट कोट्यातील पात्र विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ
चिपळूण (प्रतिनिधी) : राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांचे आमदार शेखर निकम यांनी स्वागत केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चिपळूण दौऱ्याप्रसंगी आमदार निकम यांनी त्यांचे स्वागत करून विद्यार्थीहिताचे निर्णय घेतल्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वर्षातून दोनवेळा सीईटी परीक्षा देण्याची संधी आणि मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय या दोन्ही बाबी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आणि कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या निर्णयांचा मोठा फायदा होणार आहे. ११ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनवेळा सीईटीची संधी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळाव्यात, या उद्देशाने आ. शेखर निकम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वी राज्यात केवळ तीन व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनवेळा सीईटी परीक्षा घेण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आणखी आठ अभ्यासक्रमांचा समावेश केल्याने आता एकूण ११ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनवेळा सीईटी परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी उपलब्ध होणार असून, त्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करून प्रवेशाची अधिक चांगली संधी मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी परीक्षांचे वेळापत्रकही आगाऊ जाहीर करण्यात आले आहे. आमदार निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे यश मिळाल्याचे मानले जात आहे. मॅनेजमेंट कोट्यातील पात्र विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने घेतलेला दुसरा निर्णयही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंत मॅनेजमेंट कोट्यातून अर्थात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या अनेक गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसमोर उच्च शिक्षणाचा खर्च भागविण्याचे मोठे आव्हान निर्माण होत होते. ही अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने आता मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे. तसेच पालकांवरील आर्थिक भार कमी होण्यासही मदत होणार आहे. शिक्षणाच्या संधी सर्व विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ व्हाव्यात, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, या दृष्टीने हे दोन्ही निर्णय महत्त्वपूर्ण आहेत.
विशेषतः कोकणातील ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाचे हे निर्णय निश्चितच दिलासादायक ठरणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने या निर्णयांचे दूरगामी सकारात्मक परिणाम होतील, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार शेखर निकम यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी माजी आमदार विनय नातू, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, जयंद्रथ खताते, दशरथ दाभोळकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.













