वेंगुर्ले l दाजी नाईक :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या नियमित सागरी गस्तीचा भाग म्हणून, रेडी बंदर येथील सीमाशुल्क प्रतिबंधक पथकाने शनिवारी अनधिकृत रित्या मासेमारी करणाऱ्या गोवा येथील मासेमारी नौकेला पकडून कारवाई केली.
रेडी येथे दीपक गंगाधर गायकवाड कस्टम्स निरीक्षक
यांच्या टीम ने ही कारवाई केली. DEVACHE BESSAOV (IND-GA-01-MM-550) नावाची मासेमारी नौका तपासणी दरम्यान अडवली. ही नौका गोवा राज्यात नोंदणीकृत असून, ती महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या सागरी हद्दीत मासेमारी करताना आढळून आली. तपासणी दरम्यान नौकेवर सुमारे ५० किलो मासे व पाच खलाशी आढळून आले. तपासणीमध्ये सदर नौकेकडे वैध मासेमारी परवाना उपलब्ध नसल्याचे दिसून आले. कारण सादर करण्यात आलेला परवाना कालबाहा होता. तपासणीदरम्यान कोणताही तस्करीचा माल किंवा परदेशी नागरिक आढळून आलेले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीमाशुल्क विभागाकडून सातत्याने सागरी गस्त व देखरेख ठेवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर प्रकरण मस्यव्यवसायाशी संबंधित असल्याने, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित मासेमारी नौका महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.











