वेतोरे-वरचीवाडी येथील प्रगतशील शेतकरी सुशांत नाईक “वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराने” सन्मानित..

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाला गौरव

वेंगुर्ले : दाजी नाईक

वेतोरे-वरचीवाडी चे पोलीस पाटील तथा प्रगतशील शेतकरी श्री. सुशांत मोहन नाईक यांना कोकण विभागातून आंबा, काजू व भाजीपाला उत्पादक व विक्री शेतकरी म्हणून वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान यांचा “वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार” महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला पर्यटन व जलसंधारण राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक तसेच विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतीशी असलेली निष्ठा, सातत्यपूर्ण मेहनत, आंबा-काजू व भाजीपाला उत्पादनातून साधलेली उल्लेखनीय प्रगती आणि कष्टातून उभे केलेले यश यामुळे प्राप्त झालेला हा सन्मान निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांच्या यशातून कोकणातील शेतकऱ्यांना शेतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची आणि मेहनतीच्या बळावर प्रगती साधण्याची प्रेरणा मिळते अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. दरम्यान सुशांत नाईक यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.