दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी
लांजा (प्रतिनिधी) :दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्न आणि समस्या संदर्भात दिव्यांग जनकल्याण संस्थेच्या वतीने लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली सुनील कुरूप यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले.
नगराध्यक्ष यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांजा शहरांमध्ये साधारणपणे दिव्यांग बांधवांची संख्या ही १८० च्या वरती आहे. परंतु शहराच्या सर्वांगीण विकासात समाजातील सर्वात दुर्बल घटक म्हणजेच दिव्यांग बांधवांना डावलले जात आहे .त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आपण आपल्या सहकार्यातून न्याय द्यावा.असे सांगतानाच पुढील प्रमाणे मागण्या केल्या आहेत. दिव्यांग पाच टक्के निधी सेसफंडातून तात्काळ वापरण्यात अथवा खर्च करण्यात यावा.
तसेच दिव्यांगांच्या स्वयंरोजगार व स्वयंचलित वाहनासाठी दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या निधी हा या साहित्याच्या किमतीपेक्षा कमी मिळत आहे. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी २०० चौ.मी जागा अथवा व्यावसायिक खोके महामार्गालगत सार्वजनिक ठिकाणी शहरात उपलब्ध करून द्यावेत. आपल्या कार्यालयात उच्चशिक्षित दिव्यांगांना चार टक्के आरक्षणानुसार भरती करण्याबाबत कार्यवाही व्हावी. तसेच नगरपंचायत विकास आराखड्यामध्ये दिव्यांगांसाठी निधी मिळावा अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत.
दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सादर करण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी दिव्यांग जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे तसेच दीपक बाईंग, किरण धनावडे, मयूर जाधव,सचिन तांबे, संजय कुडकर, दिनकर मांडवकर ,रवींद्र गुरव, प्रकाश साळवी, चंदना गुरव, शगुप्ता नाईक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.











