लांजा येथील मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचा सलग ११ वर्षे उपक्रम
लांजा (प्रतिनिधी): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीन देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजाच्या वतीने सलग अकराव्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तहसील कार्यालया समोर मोफत चहा नाश्त्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. जातिभेदाच्या भिंती बाजूला सारुन केवळ सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यात्रेसाठी जाणाऱ्या हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.
हम सबके, सब हमारे हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा या संस्थेने खऱ्या अर्थाने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिलेली आहे. कोरोना काळात रुग्णांना मदत करणे असो किंवा चिपळूण, महाड येथील पुरग्रस्तांना मदत या प्रत्येक वेळी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीने जातीभेदाच्या पलीकडे जाऊन आपले सामाजिक योगदान दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडी येथील भराडीन देवीच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे व इतर भागातून चाकरमानी आणि भाविक हे सिंधुदुर्गात दाखल होतात. यात्रेसाठी येणाऱ्या या भाविकांसाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी ही गेल्या दहा वर्षांपासून मोफत चहा नाष्ट्याची सोय करत आहे या वर्षी सलग ११ व्या वर्षी या भाविकांसाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावर लांजा तहसील कार्यालयासमोरील जागेत तंबू उभारून प्रवाशांना मोफत चहा नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली होती. दिवस-रात्र या संस्थेने भाविकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने आपल्या सामाजिक एकतेचे दर्शन घडवले आहे. भाविकांनी या ठिकाणी थांबून चहा नाश्ताचा लाभ घेतला आणि सोसायटीच्या सर्व पदाधिकारी सदस्यांना विशेष धन्यवाद दिले.
या संपूर्ण उपक्रमासाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक, संस्थापक अकील नाईक, उपाध्यक्ष ताज महंम्मद मुजावर,सचिव सिराज मालीम, महिला अध्यक्षा शगुफ्ता नाईक, सदस्य आरिफ घारे, धनावडे मामा, राजू नाईक तसेच इलाईट डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा आणि मुस्लिम वेलफेयर चे सल्लागार समीर घारे आदींनी सहकार्य केले.











