तब्बल 15 वर्षांनंतर युतीची सत्ता, युतीला पुन्हा गतवैभव
आशीष कारेकर(गुहागर):
गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने आपले वर्चस्व निर्माण केले 10 पैकी 9 पंचायत समिती जागांवर भाजप शिवसेना युतीने आपली सत्ता काबीज केली आहे तर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीच्या माध्यमातून 5 पैकी तीन जागांवर विजय मिळवला आहे. साहजिकच यामुळे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना चांगलाच धोबीपछाड या निवडणुकीत मिळाल्याचे दिसून येत आहे.
गुहागर तालुका हा सुरुवातीला युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र युतीच्या विधानसभेच्या जागा वाटपात झालेल्या झालेल्या वादात युती तुटल्याचा फायदा भास्कर जाधव यांनी मिळवला. त्यानंतर आजतागायत याठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत भास्कर जाधवांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते. अखेर भास्कर जाधव यांचे हे वर्चस्व मोडीत काढण्यात भाजप शिवसेना युतीला यश आले असून तब्बल 15 वर्षानंतर गुहागर पंचायत समितीवर आपली सत्ता काबीज केली आहे. साहजिकच यामुळे गुहागर पंचायत समितीत भाजप – शिवसेना युतीला गतवैभव प्राप्त झाले आहे.
मागील काही वर्षे याठिकाणी युती न करता भाजप व शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढवत होते.मात्र मतांची विभागणी होत असल्याने याठिकाणी सत्ता स्थापन करणे शक्य झाले नाही.अखेर यावेळी दोन्ही पक्षांनी एक पाऊल मागे घेत युती केल्याने सत्ता स्थापन करणे शक्य झाले आहे.या निवडणुकीत युतीच्या माध्यमातून आम. भास्कर जाधव यांच्या उबाठाचा सुफडा साफ करत तब्बल 9 जागांवर घवघवीत यश मिळवले.आम.भास्कर जाधव यांना केवळ एका जागेवर आपला उमेदवार निवडून आणता आला.तर जिल्हा परिषद निवडणुकीत देखील 5 पैकी 3 जागांवर विजय मिळवून युतीने जाधवांना शह दिला आहे.
मुख्य म्हणजे विद्यमान आमदार असताना देखील येथील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवणे आम. भास्कर जाधव यांना जमलेले नाही.उलट त्यांच्या तालुकाध्यक्षांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले.जिल्हा परिषदेत आम. भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचा विजय सोडला तर अन्य ठिकाणी जोरदार धक्का बसला आहे.एका ठिकाणी मनसेने आपले खाते उघडले असून उबाठाला जिल्हा परिषद निवडणुकीत देखील गुहागरमध्ये केवळ एक जागा जिंकता आली आहे.नगरपंचायत निवडणूकीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाल्याने आम. भास्कर जाधवांना आत्मपरीक्षण करायला भाग पडणारा हा पराभव असल्याचे बोलले जात आहे.












