ग्रामीण भागात उद्योगांना चालना, रोजगारनिर्मितीला वेग
बारामती-इंदापूर परिसरासाठी मोठा विकासाचा निर्णय
इंदापूर तालुक्यातील रत्नापुरी इस्टेटमधील 1000 एकर जमीन MIDC कडे हस्तांतरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे इंदापूर व बारामती परिसरात औद्योगिक गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे. स्थानिक उद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होतील तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. उद्योगविकासाच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचा सरकारचा उद्देश आहे.
पुणे : स्थानिक उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने इंदापूरच्या रत्नापुरी इस्टेटमधील 1000 एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (MIDC) देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे इंदापूर व बारामती परिसरात औद्योगिक गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, असे सरकारच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. जमीन वाटप हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून इंदापूरशी भावनिक नाते असलेले दिवंगत अजितदादांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांना रोजगार मिळावा आणि औद्योगिक विकासातून परिसराचा कायापालट व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रस्तावित औद्योगिक वसाहत वालचंदनगर औद्योगिक क्षेत्राजवळ असणार असून येथे एरोस्पेस, संरक्षण तसेच साखर कारखाना यंत्रसामग्री निर्मिती करणारे उद्योग कार्यरत आहेत. हे ठिकाण बारामती औद्योगिक क्षेत्रापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असून येथे ऑटोमोबाईल, अन्न प्रक्रिया यांसारखे विविध उद्योग आधीच स्थिरावले आहेत.
हस्तांतरित करण्यात आलेली जमीन यापूर्वी महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाच्या अखत्यारित होती. सुरुवातीला MIDC ने रत्नापुरीतील तीन गावांमधील 135 हेक्टर जमीन संपादनासाठी परवानगी मागितली होती. यापैकी 131 हेक्टर जमीन जुलै महिन्यात प्राप्त झाली असून उर्वरित 65 हेक्टर जमीन मिळणे बाकी आहे. त्यानंतर नियोजित औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त 600 हेक्टर जमीन मागण्यात आली.
याच बैठकीत बारामती तालुक्यातील कटफळ गावात क्रीडा संकुल उभारणीस देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सुमारे 70 हजार चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी 75.13 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यामुळे परिसरातील क्रीडा विकासाला चालना मिळणार आहे.











