नारायण सावंत यांची ‘किमान वेतन महामंडळ’ जिल्हा समन्वयकपदी निवड

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते सत्कार : अभिनंदनाचा वर्षाव

सावंतवाडी । प्रतिनिधी :आपल्या सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केलेले सावंतवाडीचे उद्योजक व भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते नारायण सावंत यांची ‘किमान वेतन महामंडळ’ आयोगाच्या जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे राजकीय व सामाजिक स्तरावरून कौतुक होत आहे.

नारायण सावंत हे खासदार उदयनराजे भोसले यांचे अत्यंत विश्वासू आणि भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील कामगार वर्गाच्या समस्यांना वाचा फुटेल आणि किमान वेतन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गुरुकुल येथे सत्कार समारंभ

सावंत यांच्या निवडीची घोषणा होताच, सावंतवाडीतील ‘गुरुकुल’ येथे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना साळगावकर म्हणाले की, “सावंत यांची निवड ही त्यांच्या सातत्यपूर्ण कामाचा सन्मान आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्हयातील सामान्य कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळेल.”

मान्यवरांची उपस्थिती

या सत्कार प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक आनंद नेवगी यांच्यासह गुरुकुल व राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, अभय पंडित, मनोज घाटकर, उमेश खटावकर, शिवम सावंत, अशोक पेडणेकर, मयूर लाखे, इप्तिकार राजगुरू, कादर गवंडी, धीरज गावडे आणि रवी जाधव यांचा समावेश होता.

आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नारायण सावंत यांनी, पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून कामगारांच्या हक्कासाठी कटिबद्ध राहू, अशी प्रतिक्रिया दिली.