योगिता डेंटल कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन्स दिन विविध उपक्रमांनी साजरा

खेड (प्रतिनिधी) : योगिता डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलच्या ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागातर्फे शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन्स दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने तोंड, जबडा आणि चेहऱ्याशी संबंधित आजारांबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या उपक्रमाद्वारे ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जनची भूमिका समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांमध्ये होणारे जबड्याचे फ्रॅक्चर, तोंडाचा कर्करोग, प्रीकॅन्सरस आजार, चेहऱ्याचे विविध विकार, जबड्यावरील शस्त्रक्रिया, डेंटल इम्प्लांट तसेच चेहऱ्याच्या सौंदर्यविषयक उपचारांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास प्रभावी उपचार शक्य होतात, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
कार्यक्रमांतर्गत रुग्ण मार्गदर्शन शिबिर, आरोग्य जनजागृती उपक्रम, व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना आधुनिक शस्त्रक्रियात्मक सुविधा उपलब्ध करून देण्यात योगिता डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल अग्रेसर असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमांगी पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. विभागप्रमुख डॉ. निकिल कुमार जैन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, प्राध्यापक डॉ. केदार वैद्य, सहप्राध्यापक डॉ. शोएब जेंदी तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ. नाझिश, डॉ. विशाखा आणि डॉ. तहसीन देसाई यांचे सहकार्य लाभणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये तोंडाच्या आरोग्याबाबत अधिक जागरूकता निर्माण व्हावी आणि गंभीर आजारांचे लवकर निदान व्हावे, असा मानस विभागाने व्यक्त केला आहे.