पीएमजेजेबीवाय, पीएमएसबीवाय, अटल पेन्शन योजनेसह सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन
वेंगुर्ले : प्रतिनिधी
भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘फायनान्शियल इन्क्लुजन सॅच्युरेशन कॅम्पेन’ अर्थात आर्थिक समावेशन अभियानांतर्गत नाणोस ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र, आजगाव शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध शासकीय आर्थिक योजनांची माहिती तसेच सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या LDO बेनझीर शेख, बँक ऑफ इंडियाचे LDM ऋषिकेश गावडे, सरपंच साक्षी शेट्ये, उपसरपंच अमिता नाणोसकर तसेच ग्रामपंचायत सदस्य, आर्थिक साक्षरता केंद्र वेंगुर्ला समन्वयक सहदेव परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्र, आजगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक रिच्छपाल सिंग यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
यावेळी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) तसेच अटल पेन्शन योजना (APY) या योजनांचे फायदे, त्यासाठीची नोंदणी आणि नागरिकांना मिळणारे आर्थिक संरक्षण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आर्थिक समावेशन अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंग व आर्थिक सेवा पोहोचविण्याचे महत्त्व विशद करण्यात आले.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या LDO बेनझीर शेख यांनी सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांबाबत नागरिकांना जागरूक केले. डिजिटल अरेस्ट, ओटीपीच्या माध्यमातून होणारी फसवणूक तसेच विविध ऑनलाइन आर्थिक गैरव्यवहारांपासून कसे सावध राहावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा गोपनीय तपशील देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या अभियानांतर्गत २१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विविध बँकिंग सेवा, विमा योजना, केवायसी अद्ययावतीकरण, नामनिर्देशन नोंदणी आणि आर्थिक जनजागृती यांसारख्या उपक्रमांवर भर देण्यात येत आहे.












