रत्नागिरी : तंत्रज्ञानाच्या वेगासोबत पाऊल टाकत महावितरणने आता वीज मोजणीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. सध्या ९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान राज्यात ‘स्मार्ट मीटर पंधरवडा’ साजरा होत असून, याद्वारे ग्राहकांना स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरचे महत्त्व पटवून दिले जात आहे. अचूक बिलिंग आणि वीजदरातील सवलत यामुळे हे मीटर ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.
जुनी मीटर रीडिंग पद्धत अनेकदा तक्रारींना निमंत्रण देणारी ठरत असे. मानवी हस्तक्षेपामुळे चुकीचे रीडिंग किंवा घराचे कुलूप बंद असल्याने अंदाजे बिल येण्याचे प्रकार घडायचे. मात्र, नवीन स्मार्ट टीओडी मीटर पूर्णपणे स्वयंचलित आहेत. यामुळे मानवी चूक शून्य होऊन ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वीजवापराचे अचूक बिल मिळणार आहे. विशेष म्हणजे, घर किंवा कंपाउंड बंद असले तरी रीडिंग आपोआप नोंदवले जाणार आहे.
या मीटरचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘टीओडी’ प्रणाली. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मंजुरीनुसार, १ जुलै २०२५ पासून घरगुती ग्राहकांसाठी विशेष सवलत लागू करण्यात आली आहे:
-
सवलत: सकाळी ९ ते सायंकाळी या कालावधीत वीज वापरल्यास प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत दिली जात आहे.
-
पारदर्शकता: ग्राहक आपल्या मोबाईलवर तासागणिक होणारा वीजवापर, व्होल्टेज आणि लोडची माहिती सहज पाहू शकतात.
हे स्मार्ट मीटर महावितरणकडून पूर्णपणे मोफत बसवून दिले जात आहेत. यासाठी ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच ही यंत्रणा सध्याच्या मासिक बिलिंगप्रमाणेच ‘पोस्टपेड’ स्वरूपाची आहे.
ज्या ग्राहकांनी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत सौर प्रकल्प बसवले आहेत, त्यांच्यासाठी हे मीटर अत्यंत उपयुक्त आहेत. नेटमीटरिंग प्रणालीमुळे सौर ऊर्जेचा वापर आणि ग्रीडला दिलेली अतिरिक्त वीज यांचा अचूक हिशेब ठेवणे आता अधिक सोपे झाले आहे.












