स्वागताध्यक्ष डॉ. संजय भावे यांचे संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन
दापोली प्रतिनिधी-चिपळूण तालुक्यातील पालवण येथे उद्यापासून राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत असून, या साहित्यिक पर्वात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. संजय भावे यांनी केले आहे. कोकणातील पहिलेच राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन असल्याने साहित्यप्रेमी, शेतकरी तसेच सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष या संमेलनाकडे लागले आहे.
हे संमेलन १३, १४ आणि १५ फेब्रुवारी या कालावधीत पालवण येथील कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणावर पार पडणार आहे. ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार या विषयांवर आधारित साहित्यिक चर्चा, परिसंवाद, व्याख्याने आणि सखोल विचारमंथन या संमेलनात होणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यासह राज्यातील विविध मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे भूषवणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या साहित्यिक मेळाव्याचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे साहित्य, शेती, सहकार तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर एकाच व्यासपीठावर येणार आहेत.












