जिल्हास्तरीय योगासना स्पर्धेत रोटरी स्कूलची चमकदार कामगिरी; दोन सुवर्ण तर एक कांस्य पदक पटकावले

खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘मिस्टर योगी व मिस योगिनी योगासना स्पर्धा २०२५-२६’मध्ये खेड येथील रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावत आपली योगकौशल्ये सिद्ध केली.
शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ रोजी शिव योगा क्लासेस तसेच राजेश सोहनी अँड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान यशवंत हरी गोखले भवन, रत्नागिरी येथे ही जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील अनेक योगपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेचे वातावरण अत्यंत चुरशीचे असून प्रत्येक स्पर्धकाने उत्कृष्ट सादरीकरण केले.
या स्पर्धेत १० वर्षांखालील मुलांच्या ट्रॅडिशनल वैयक्तिक प्रकारात कु. आरुष पाटील याने सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे १४ वर्षांखालील मुलांच्या ट्रॅडिशनल वैयक्तिक प्रकारात कु. आयुष पाटील यानेही सुवर्णपदक मिळवून आपली कामगिरी उजळवली. १८ वर्षांखालील मुलांच्या ट्रॅडिशनल वैयक्तिक प्रकारात कु. स्पंदन धामणे याने कांस्य पदक मिळवत रोटरी स्कूलच्या यशात भर घातली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशामागे योगा प्रशिक्षक डॉ. गौरव आंब्रे आणि सौ. शीतल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणामुळेच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत जिल्हास्तरावर मानाचे स्थान मिळवले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.