हवामानातील बदलाचा हापूसवर विपरीत परिणाम; मोहर करपला

शेतकरी आर्थिक संकटात

राजेंद्र साटम (शिरगाव) :     कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर यंदा हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम झाल्याचे चित्र शिरगाव परिसरात दिसून येत आहे.

यावर्षी मोठ्या प्रमाणावर आलेला मोहर बदललेल्या वातावरणामुळे करपून गळाल्याने बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

उशिरापर्यंत लांबलेल्या पावसाळ्यानंतर अचानक वाढलेली थंडी आणि किमान तापमानातील तीव्र घसरण यामुळे आंब्याच्या बहरावर प्रतिकूल परिणाम झाला. तसेच यावर्षी थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे तुडतुडा व थ्रिप्स या कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तसेच तापमानातील अचानक बदलामुळे नैसर्गिक परागीभवन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. परिणामी, मोठ्या अपेक्षेने बहरलेला मोहर काळवंडून गळून पडला.

आंबा पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून महागडी कीटकनाशके व औषधफवारणी केली; मात्र त्यातून अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही. कलमांची देखभाल, साफसफाई, खते, मशागत आणि मजुरीचा वाढता खर्च यामुळे बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कष्टाने जोपासलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. हवामानातील बदल आणि कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव या दुहेरी संकटात बागायतदार सापडले आहेत.

आंबा व काजू ही येथील प्रमुख नगदी पिके असून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आणि स्थानिक अर्थकारण मोठ्या प्रमाणावर त्यावर अवलंबून आहे. हवामानातील बदलामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला; आता आधार कोणाचा?” असा प्रश्न बागायतदार उपस्थित करीत आहेत.

दरम्यान, कृषी विभागाने बाधित बागांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत व शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे.