जांभवडे येथील श्रीदेवी भगवती मंदिरात हरिनाम सप्ताह भक्तिभावात संपन्न

दैनिक ‘प्रहार’ हरिनाम सप्ताह विशेषांकाचे प्रकाशन

स्वप्निल कदम, कुडाळ:-जांभवडे गावचे ग्रामदैवत श्रीदेवी भगवती मंदिर येथे नुकताच हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण सप्ताहभर मंदिर परिसर हरिनामाच्या गजराने, अभंग-भजनांच्या निनादाने आणि भक्तीच्या ओलाव्याने भारावून गेला होता. आई भगवतीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील तसेच दूरदूरहून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दैनिक ‘प्रहार’च्या हरिनाम सप्ताह विशेषांकाचे प्रकाशन मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे दस्तऐवजीकरण करणारा हा विशेषांक उपस्थित मान्यवर व भाविकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करत त्याचे मनापासून कौतुक केले.

या प्रसंगी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मडव, जांभवडे गावाचे सरपंच अमित मडव, पंढरीनाथ मडव, नंदकिशोर मडव, मधुकर मडव, संतोष मडव, रमेश मडव, गोविंद मडव, उत्तम मडव, राजेश मडव, विजय मडव, जयप्रकाश मडव, संतोष मडव, प्रशांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी दैनिक ‘प्रहार’च्या माध्यमातून हरिनाम सप्ताह, भक्तीपरंपरा व ग्रामसंस्कृती जतन करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.

हरिनाम सप्ताहादरम्यान मंदिरात भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेत आई भगवतीच्या चरणी नतमस्तक होत आपली भक्ती अर्पण केली. सप्ताहाची सांगता महाआरती व महाप्रसादाने करण्यात आली.

या भक्तिरसपूर्ण सोहळ्यामुळे जांभवडे गावात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना दृढ होत असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.