विजयदुर्ग ( प्रतिनिधी ): विजयदुर्ग, रामेश्वर आणि गिर्ये या तीन गावातील ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर यात्रोत्सवाला गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून हा यात्रोत्सव १७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दरम्यान, आज महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविकांनी रामेश्वराचे दर्शन घेतले. ही यात्रा अनेक दुकानांनी सजली होती. यंदा मंदिराच्या सभोवती यात्रा भरण्याचे निश्चित झाल्यानंतर यात्रेतील गर्दी प्रकर्षाने दिसून आली. रोज रात्री लोककला याचबरोबर पालखी सोहळा, विजयदुर्ग पंचक्रोशीतील प्रसिद्ध भजनी बुवांची सुस्त्राव्य भजने यामुळे भाविकांना एक प्रकारची मेजवानीच होती.
गेली काही वर्षे ही यात्रा मंदिराच्या वरच्या भागात भरली जात होती. परंतु मंदिराच्या सभोवती असणाऱ्या दुकानांवर या यात्रेचा परिणाम जाणवत होता. त्यामुळे देवस्थान समिती, जीर्णोद्धार समिती, पुजारी मंडळी, उत्सव कमिटी आणि तिन्ही गावातील ग्रामस्थ यांच्या एक निर्णयाने यंदापासून ही यात्रा पारंपारिक पद्धतीने मंदिराच्या खालच्या भागातच भरण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे यंदा यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. ही यात्रा संपन्न होण्यासाठी रामेश्वर मंदिराच्या सर्व कमिट्या याचबरोबर विजयदुर्ग पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ यांनी अथक मेहनत घेतली.












