हर हर महादेव’च्या जयघोषात तेरवण-मेढे दुमदुमले; श्री नागनाथ चरणी भक्तांचा जनसागर!

हजारो भक्तांनी घेतले दर्शन

​दोडामार्ग:सुहास देसाई
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांचे श्रद्धास्थान असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील पांडवकालीन श्री नागनाथ तीर्थक्षेत्रात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. रविवारी दर्शनासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.तसेच तालुका प्रशासन कडून चोख व्यवस्था करण्यात आली होती देवस्थान कमिटी व सोनवल हायस्कुल शिक्षक विदयार्थी यांनी दर्शन रागेसाठी व्यवस्थापन केले होते

​विद्युत रोषणाई आणि भक्तीचा जागर
​महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण नागनाथ मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नमः शिवाय’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. शनिवारी रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिर प्रशासन, स्थानिक सल्लागार उपसमिती आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत भाविकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.

​अनोखी परंपरा: ‘पंचधातूचे अवयव’ अर्पण करून नवसपूर्ती
​श्री नागनाथ देवस्थान हे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथील परंपरेनुसार
​पहाटे ४ वाजल्यापासून भाविकांनी मंदिर परिसरातील पवित्र तळीत स्नान करून ओल्या अंगाने अभिषेक केला.यावेळी तळी मध्ये स्नान करण्यासाठी बाल ते वयोवृद्ध भाविक सहभागी झाले होते
​शरीराच्या व्याधी दूर व्हाव्यात किंवा झालेल्या आजारातून मुक्ती मिळावी, यासाठी हात, पाय, कान, नाक यांसारखे शरीराचे पंचधातूचे अवयव तळीत अर्पण करून भाविकांनी आपला नवस पूर्ण केला. ही अनोखी परंपरा अनुभवण्यासाठी तिन्ही राज्यांतून भाविक येथे मोठ्या संख्येने येतात.

​युवा नेते विशाल परब यांनी घेतले दर्शन
​भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनीही रविवारी श्री नागनाथाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, रंगनाथ गवस, संजय सातार्डेकर, पाराशर सावंत, राजेश फुलारी, देवस्थान समितीचे अध्यक्ष देऊ गवस, प्रेमानंद देसाई आणि शिरीष नाईक यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

​या सोहळ्यादरम्यान थंड पेय सोय राजेंद्र निबाळकर मित्र मंडळाकडून करण्यात आली होती
भक्तिमय वातावरण आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे यंदाचा शिवरात्र उत्सव निर्विघ्नपणे पार पडला.यावेळी बस व्यवस्था हि चोख करण्यात आली होती