दापोली (विशेष प्रतिनिधी) – दापोली तालुक्यातील राजकीय घडामोडींमध्ये आज महत्त्वाची भर पडली आहे. टेटवली पंचायत समिती गणातून नवनिर्वाचित झालेले धडाडीचे व अभ्यासू पंचायत समिती सदस्य निलेश अशोक शेठ यांची पंचायत समिती दापोलीमध्ये शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी तसेच मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.
ही निवड गृहराज्यमंत्री तथा दापोलीचे आमदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, यामुळे दापोली पंचायत समितीतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीतील कामकाज अधिक प्रभावीपणे राबवणे, विकासकामांना गती देणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षातील वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे.
निलेश अशोक शेठ यांनी यापूर्वीही सामाजिक व विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा आणि नेतृत्वगुणांचा पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. गटनेते आणि मुख्य प्रतोद या दोन्ही जबाबदाऱ्या स्वीकारताना त्यांनी वरिष्ठांचे आभार मानत, दापोली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली आहे.
या निवडीमुळे दापोली तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात पंचायत समितीच्या माध्यमातून अधिक परिणामकारक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













