सहाय्यक निबंधक यांचे मालवणातील पिग्मी एजंटनी वेधले लक्ष
मालवण | प्रतिनिधी : सहकारी पतसंस्था पिग्मी एजंट कमिशन २.५० टक्केच घेण्यात यावे याबाबत पत्र सर्व पतसंस्था यांना काढण्यात आले आहे. मात्र हा निर्णय सर्व पिग्मी एजंटसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरणारा आहे. 3 टक्के कमिशन अनेक वर्षे असताना २.५० टक्के कमिशन निश्चित करण्यात आल्याने पिग्मी कमिशन हाच एकमेव उत्पन्न स्रोत असणाऱ्या पिग्मी एजंट व त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार आहे, त्यामुळे कमिशन वाढवून मिळावे, किमान पूर्ववत 3 टक्के व्हावे अशी मागणी मालवण तालुक्यातील पिग्मी एजंट्सनी मालवण येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवेदनाद्वारे केली.
मालवण मेढा राजकोट येथील सहकारी संस्था सहाय्यक निबंधक कार्यालयात सहाय्यक निबंधक श्री. अजय हिर्लेकर यांची भेट घेऊन मालवण मधील विविध सहकारी पतसंस्थेच्या पिग्मी एजंटनी कमी झालेल्या कमिशन टक्केवारी बाबत चर्चा करत निवेदन सादर केले. यावेळी गौरव बिलये, आप्पा मालंडकर, चेतन हडकर, उदय घाडी, जितेंद्र राणे, प्रशांत पांगे, शैलेश मुणगेकर, नरेंद्र कोदे, गोविंद शेटये, विनोद बिलये, संतोष गोवेकर, सुनील मालवणकर, संतोष वायंगणकर, प्रथमेश लुडबे, मनस्वी कदम, कविता मयेकर, सारिका मोरजे, मोक्षदा धुरी, प्राची तारी, रुचिता मुणगेकर, प्रेमानंद मलये, श्वेता हळदणकर, विल्सन गिरकर, फुलेतेना नरोना, शुभदा साटम, श्रेया गवंडी आदी व इतर पिग्मी एजंट उपस्थित होते.
मागील ३० वर्षांपासून आम्ही ३ टक्के कमिशनवर काम करत आलो आहोत. कोरोना सारखे संकट असो सतत वाढणारी महागाई असो, पिग्मी एजंट हा घटक कायम उपेक्षित राहिलेला आहे. आजच्या वाढत्या महागाईच्या परिस्थितीत ३% कमिशनवर काम करणेच अत्यंत कठीण झाले आहे, कारण हे कमिशन महागाईच्या तुलनेत अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत २.५०% कमिशनवर काम करणे आम्हाला अधिकच कठीण होणार आहे.
पतसंस्थांची आर्थिक घडी सुरळीत ठेवण्यासाठी पिग्मी एजंट हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. आम्ही पिग्मी संकलन, कर्ज हप्ते गोळा करणे यांसारख्या विविध जबाबदाऱ्या उन्हात-पावसात फिरून प्रामाणिकपणे पार पाडत असतो. तरी देखील आजपर्यंत पिग्मी एजंटांसाठी कोणत्याही प्रकारच्या योजना उपलब्ध नाहीत. तसेच विमा, बोनस, ग्रॅज्युइटी, पेन्शन, मेडिकल अशा कोणत्याही सुविधा आम्हाला किंवा आमच्या कुटुंबियांना मिळत नाहीत, असे पिग्मी एजंट्सनी निवेदनात म्हटले आहे.
अशा परिस्थितीत कमिशन २.५०% पर्यंत कमी करणे हे आमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारे असून, आमचे दैनंदिन जीवन अधिक कठीण बनवणारे आहे. आजपर्यंत पिग्मी एजंट हा घटक उपेक्षित राहिलेला आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय पुनर्विचार करून पिग्मी एजंटांचे कमिशन सध्याच्या महागाईच्या दृष्टीने वाढवून द्यावे, अशी मागणी पिग्मी एजंट्सनी शासनाकडे केली आहे.
यावेळी सहायक निबंधक अजय हिर्लेकर यांनी सदर कमिशन कपातीचा निर्णय राज्यस्तरावर घेण्यात आला आहे. त्यामुळे पिग्मी एजंटची मागणी आपण वरिष्ठ पातळीपर्यंत पोहचवू असे सांगितले. याबाबत वरिष्ठ पातळीवरही आम्ही लक्ष वेधणार असल्याचे पिग्मी एजंट्सनी सांगितले.












