मधमाशांच्या हल्ल्यात शिरगावातील वृद्धाचा मृत्यू

घराच्या अंगणात काम करताना घटना; 

उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका

शिरगाव (प्रतिनिधी) –    देवगड तालुक्यातील शिरगाव-साटमवाडी येथील रहिवासी अनिल लक्ष्मण साटम (वय ६०) यांच्यावर रविवारी सायंकाळी मधमाशांनी भीषण हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अनिल साटम हे रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात काम करत होते. अचानक मधमाशांच्या थव्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. मधमाशांच्या दंशामुळे ते जागीच बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शिरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्याचा मनमिळाऊ स्वभाव होता.ते नाईक साटम समाज उन्नती मंडळाचे सक्रिय सभासद होते. विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सोमवारी सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून तसेच दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.