भांबेड बेर्डेवाडी-पेठदेव येथे ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन;

सलग ४६ व्या वर्षी नवरात्र उत्सवाचे आयोजन, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

संतोष कोत्रे
लांजा: तालुक्यातील भांबेड येथील श्री स्वामी समर्थ नवतरुण मित्रमंडळ, नवरात्र उत्सव समिती, बेर्डेवाडी-पेठदेव यांच्या वतीने रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर ते मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर या कालावधीत
शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भजन, मंगळागौर, टिपरी नृत्य, रेकॉर्ड डान्स स्पर्धा आणि गरब्याची धूम अनुभवास मिळणार आहे.
यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी देवीभक्तांना अनुभवायला मिळणार आहे. मंडळाची स्थापना १९८० मध्ये झाली असून, यंदा मंडळाचा ४६ वा वर्षोत्सव साजरा करण्यात येत आहे. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री शारदादेवीच्या मूर्तीचे आगमन, प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा-अर्चा होणार आहे. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ, कुडेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मंगळागौर स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या श्री महालक्ष्मी मंगळागौर ग्रुप, भांबेड यांचे सादरीकरण होणार आहे. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता लांजा तालुकास्तरीय सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १५ वर्षांपर्यंतचा लहान गट आणि खुला गट असे दोन गट असतील. लहान गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २,०००, १,५०० व १,००० रुपये, तर खुल्या गटासाठी अनुक्रमे २,५००, २,००० व १,५०० रुपये अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी अधिक माहितीसाठी ऋषिकेश बेर्डे९३७३५०५७७३ राहूल गांगण ७८७५८६७०८८ यांच्याशी संपर्क साधावा.
गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता कोकणच्या पारंपरिक लोककलेचे दर्शन घडविणारा टिपरी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शक्तीवाले शाहीर विद्या पांचाळ यांचे मोरया टिपरी नृत्य, देवळे, तसेच तुरेवाले शाहीर सौ. प्रांजली उंडे, सहगायिका सौ. रेशमा पोवार यांच्या सहभागाने श्री केदारलिंग टिपरी नृत्य, गोठणे (उंडेवाडी) यांचे सादरीकरण होणार आहे. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता श्री शारदादेवीचा गोंधळ, शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता श्री स्वामी समर्थ नवतरुण मित्रमंडळाचे सुश्राव्य भजन.
रविवार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता फॅन्सी गरबा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता श्री शारदादेवीचा दुर्गाष्टमी होम आयोजित करण्यात आला असून, दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिलांसाठी हळदी-कुंकू आणि होम मिनिस्टर कार्यक्रम होईल. रात्री ९ वाजता सोनुबाबा कुर्णेकर पायी दिंडी सेवा संस्था, भांबेड यांच्या वतीने ह.भ.प. श्री. संतोषबुवा कुर्णेकर यांचा हरिपाठ होणार आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दसरा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत दररोज दुपारी १२.३० वाजता आणि रात्री ७.३० वाजता श्री शारदादेवीची आरती, तसेच रात्री ९ वाजता गरबा नृत्य होणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेनुसार सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता श्री शारदादेवीचा वाजत-गाजत आणि जयघोषात विसर्जन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या नवरात्रोत्सवात परिसरातील सर्व देवीभक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा आणि उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री स्वामी समर्थ नवतरुण मित्रमंडळ, नवरात्र उत्सव समिती, बेर्डेवाडी-पेठदेव यांच्या वतीने करण्यात आले आहे.