मसुरे | झुंजार पेडणेकर : दुर्ग मावळा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्था यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा शाळेत “इतिहासाची साधने व प्रदर्शन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. ज्ञानेश्वर राणे यांनी शिवरायांच्या इतिहासातील सुवर्ण क्षणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विविध भौतिक, लिखित व मौखिक साधनांचे सादरीकरण केले. प्राचीन किल्ले व प्रकार, शिलालेख, नाणी यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हाताळून माहिती दिली. तलवारींचे विविध प्रकार व त्यांचा प्रसंगानुरूप केला जाणारा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शिवकालीन हत्यारे प्रत्यक्ष अनुभवता आली.
या उपक्रमातून शिवकालीन इतिहासाचे जतन व्हावे व विद्यार्थ्यांच्या मनात स्फूर्ती निर्माण व्हावी हा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी केंद्रप्रमुख नारायण देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सिताराम लाकम, अशोक बागवे, प्रकाश राणे, मुख्याध्यापक श्री. गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे, विनोद सातार्डेकर, दर्शन हजारे व पालक यांनीही या उपक्रमाचा लाभ घेतला.











