कोकण संस्था अध्यक्ष दयानंद कुबल यांची माहिती

बांदा : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत सामाजिक संस्थांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि शासकीय योजनांमध्ये संधी मिळावी यासाठी जिल्हास्तरीय असोसिएशन स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कोकण संस्थेचे अध्यक्ष आणि यूनिफाईड फेडरेशन महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली. अनेक वेळा जलजीवन मिशन किंवा पोषण व इतर विकास योजनांमध्ये जिल्ह्याबाहेरील संस्थांना प्राधान्य मिळते. माहिती अभावी किंवा एकजूट नसल्याने स्थानिक संस्था मागे राहतात. ही स्थिती बदलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन सामूहिक चळवळ उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या असोसिएशनच्या माध्यमातून प्रकल्प लेखन, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, निधी उभारणी प्रशिक्षण तसेच उद्योगसंस्थांच्या सामाजिक दायित्व निधीबाबत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक संस्थांची कार्यक्षमता वाढेल. पारदर्शकता मजबूत होईल आणि जिल्ह्यातील विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढेल. अधिकाधिक संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












