कशेडी कोंडवाडी येथील सुकाई कोटेश्वरी मंदिरात चोरी; पितळी घंटांसह समई लंपास
खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि मंडणगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून मंदिरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. विशेषतः मंदिरांमधील घंटा चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, आता खेड तालुक्यातील कशेडी कोंडवाडी येथील ग्रामदैवत सुकाई कोटेश्वरी मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या चोरीच्या घटनेमुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीसह संतापाचे वातावरण पसरले आहे.
याप्रकारची सविस्तर माहिती अशी की, कशेडी कोंडवाडी येथील सुकाई कोटेश्वरी मंदिरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून देवघरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. यामध्ये प्रत्येकी १० किलो वजनाच्या १२,००० रुपये किमतीच्या दोन पितळी घंटा, प्रत्येकी ५ किलो वजनाच्या ६,००० रुपये किमतीच्या दोन पितळी घंटा आणि १,२०० रुपये किमतीची एक पितळी समई असा एकूण १९,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ही घटना २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी १८.०० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी आणि मुंबई मंडळातील सदस्यांनी आपापसात चर्चा केली. अखेर या प्रकरणाची तक्रार रघुनाथ बाबा आंबेडे (वय ६०) यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. खेड-मंडणगड पट्ट्यात सातत्याने होणाऱ्या या घंटा चोरीच्या सत्रामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.












