पाली फाटा ते निरबाडे रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात: वाहन चालकांमधून समाधान

चिपळूण (प्रतिनिधी):- तालुक्यातील पाली फाटा ते निरबाडे मार्गावरील रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात झाली असून वाहन चालकांसह ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, अजूनही काही खड्डे जैसे थे असून ते खड्डे देखील बुजवण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून पाली फाटा ते निरबाडे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ‘रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती ओढवली आहे. पावसाळ्यात तर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रसंगी खड्ड्यातील चिखलमय पाणी पादचाऱ्यांच्या अंगावरून उडाल्याने बाचाबाचीच्या घटना देखील घडल्या आहेत. याचबरोबर किरकोळ अपघात देखील घडले आहेत. पुन्हा तर आणखीनच खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने वाहन चालकांचे कंबरडे मोडत आहे. धुळीचा देखील त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली.

याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड या विभागाने दखल घेत या मार्गावरील रस्त्याची देखभाल दुरुस्तीसाठी निविदा मागवली. सुरुवातीला फारच कमी दराची निविदा आली. यामुळे पुन्हा निविदा काढण्यात आली. अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकांच्या आचारसंहिता लागू झाल्याने कामास सुरुवात झाली नव्हती. आचारसंहिता संपल्यानंतर ठेकेदाराने या मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे चढ- उतारातील काही मीटर पूर्णतः डांबरीकरण केले गेले असल्याने वाहन चालकांना मोठा दिलासा मिळत आहे. परंतु अजूनही काही खड्डे जैसे थे असून ते खड्डे देखील बुजवण्यात यावे, जेणेकरून हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर करण्यात यावा, अशी मागणी येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून होत आहे. विशेष म्हणजे शिंगोत्सवापूर्वी या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात झाली असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.